सुट्टीच्या दिवशीही केले काम ! निवृत्तीच्या वेळेस कमावले ३२.२१ कोटी रूपये
प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला येऊन प्रामाणिकपणे काम करणारी एक तरी व्यक्ती असतेच.
मुंबई : प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशीही ऑफिसला येऊन प्रामाणिकपणे काम करणारी एक तरी व्यक्ती असतेच.
सारी दुनिया मज्जा मस्ती करत असते पण ही एक व्यक्ती आपल्या कामातच आनंद शोधते.
काही कंपन्या अशा कर्मचार्यांना योग्य तो मोबदला देते तर काही कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात.भारतातील एका बड्या कंपनीने मात्र त्यांच्या एका कर्मचार्याला प्रामाणिक सेवेचा मोबदला देत निवृत्तीच्या वेळेस सुमारे ३२.२१ कोटी रूपये दिले आहेत.
इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनीतील आघाडीची लार्सन अॅण्ड टुब्रोमध्ये (L&T)सलग ५२ वर्ष काम करणार्या एएम नाईक या कर्मचार्याला निवृत्तीच्या वेळेस सुट्ट्यांच्या बदल्यात मिळालेली रक्कम सुमारे ३२.२१ कोटी रूपये आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने ही गोष्ट त्यांच्या वार्षिक अहवालातही नमूद केली आहे.
एएम नाईक हे लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांना निवृत्तीच्या वेळेस एकूण ३८.०४ कोटी रुपये देण्यात आले. यापैकी ३२.२१ कोटी रूपये हे लीव्ह एन्कॅशमेंट स्वरूपात मिळाले. ५२ वर्षाच्या सेवेत त्यांनी सुमारे १७ वर्ष कंपनीत प्रमुख पदावर काम केले. ३० सप्टेंबर रोजी ते कार्यकारी अध्यक्ष या पदावरून निवृत्त होतील. यानंतर लगेजच ऑक्टोबर महिन्यापासून ते नॉन एक्झिकिटीव्ह चेअरमॅन ही नवी भूमिका सांभाळतील.
नाईक यांच्या कार्यकाळात लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपनीने १९ अरब डॉलर कमावले. इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन सोबतच टेक्नोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि फायनान्स सेवेतही विस्तार केला. २०१६-१७ दरम्यान त्यांनी ३.३६ कोटी पगार घेतला. निवृत्तीच्या वेळेस लीव्ह एन्कॅशमेंट ३२.२१ कोटी रूपये, इतर सेवांचा भाग म्हणून १९.२७ कोटी आणि कमिशन म्हणून १८.२४ कोटी रूपये घेतले.