नवी दिल्ली : लखनऊ पासपोर्ट केंद्रात 'धार्मिक' वादाच्या रंगात लपेटलेल्या घटनेनं आता वेगळं वळण घेतलंय. एका प्रत्यक्षदर्शीनं आरोपी तन्वी सेठ यांचे आरोप फेटाळून लावलेत. 'झी मीडिया'नं याबद्दल अधिक चौकशी केली असता, जे सत्य समोर आलं ते वेगळंच आणि धक्कादायक होतं. झी मीडियाच्या हाती तन्वी यांची काही कागदपत्रं आलेत. या कागदपत्रांमधून तन्वी सेठ यांची खोटेपणाची बाजू उघड झालीय. तन्वी सेठ यांचं नाव आधारकार्डावर वेगळंच आहे आणि निकाहनामामध्ये वेगळंच आहे. आधारकार्डावर त्यांचं नाव 'तन्वी सेठ' आहे तर निकाहनाम्यात 'सादिया' लिहिण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका मुस्लिम तरुणाला पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी धर्म बदलण्याचा अजब सल्ला देण्याच्या आरोपावरून विकास मिश्रा नावाच्या अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्यात आली होती. पासपोर्टचं नुतनीकरण करून हवं असेल, तर तुम्हाला धर्म बदलावला लागेल असं लखनऊमधील तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी या दाम्पत्याला सांगण्यात आल्याचा आरोप या दोघांनी केला होता. या प्रकाराची तक्रार तन्वी सेठ यांनी ट्विटरवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडेही ट्विटरवरून केली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्यात आली होती. 


नावाचा घोळ... 


आरोपी पासपोर्ट अधिकारी विकास मिश्रा यांनी मीडियासमोर आपली बाजू मांडलीय. अर्जदारांची कागदपत्रं एका पोर्टलवर अपलोड केले जातात. या कागदपत्रांच्या आधारावर निर्णय घ्यायचा असतो की पासपोर्ट दिला जावा की नाही... मी तन्वी यांना केवळ इतकंच म्हटलं की निकाहनाम्यात जे नाव दिसतंय ते त्यांनी फाईलमध्ये दाखवावं... हे त्यांना करता आलं नाही... उद्या कुणीही कुणाच्याही नावानं पासपोर्ट बनवला तर यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहचू शकतो. 


आपण जाती-धर्माच्या नावानं कोणतीही टिप्पणी केली नाही. आपण स्वत: आंतरजातीय विवाह केलाय. त्यामुळे मी जात-धर्मात भेदभाव करत नाही. 


काय होता आरोप


हिंदू पत्नी आणि मुस्लिम पती असलेल्या या दाम्पत्यानं पोसपोर्टसाठीचा अर्ज पासपोर्ट अधिकाऱ्यानं फेटाळून लावल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर पतीला हिंदू धर्म स्वीकारण्याचा आणि सात फेरे घेऊन विवाह करण्याचा अवांछिक सल्लाही अधिकाऱ्यानं दिल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू धर्म स्वीकारला नाही तर तुमचा विवाह अमान्य केला जाईल... हिंदू रितीरिवाजानुसार, सात फेऱ्यांसोबत लग्न केलं तरच ते मान्य असेल, अशी बतावणीही या अधिकाऱ्यानं केल्याचा आरोप त्यांनी केला होता.