अनधिकृत बांधकाम : आलिशान चार इमारती स्फोटकांच्या सहाय्याने पाडल्या
केरळमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचा धडाका सुरुच आहे.
कोच्ची : केरळमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचा धडाका सुरुच आहे. मरादू पालिकेच्या हद्दीतील चार अनिधिकृत इमारती पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर या आलिशान इमारती स्फोटकांच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. यातील होली फेथ एच२ओ आणि अल्फा सेरेन अपार्टमेण्ट हे ट्विन टॉवर्स काल सकाळी ११ वाजता पाडण्यात आले तर आज जैन कोरल कोव्ह ही इमारत जमिनदोस्त करण्यात आली.
आता गोल्डन कायलोम ही इमारत पाडण्यात येणार आहे. या इमारती पाडण्यासाठी दोन इमारतींच्या खांबांवर विविध मजल्यांवर स्फोटके लावण्यात आली होती.स्फोटानंतर हवेत मोठा धुरळा उडाला. ही घटना हजारो नागरिकांनी पाहिली. ही कारवाई करताना कोणत्याही पशुपक्ष्याला दुखापत झाली नाही, कोणीही जखमी झाले नाही, त्याचप्रमाणे अन्य मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही.
कोच्चीमध्ये चार इमारत पाडण्यात आल्यात. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याने या इमारती बेकायदा ठरल्या होत्या. या अनधिकृत इमारतींवर न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे.