...तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, भाजपचे आणखी एक वाचाळवीर
भाजप नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्य काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
भोपाळ : भाजप नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्य काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आमदार राम कदम यांच्या महिलांबद्दलचं वक्तव्य ताजं असतानाच मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यामुळे वाद ओढावून घेतला आहे. जर गुरुंच्या समोर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं कुंवर विजय शाह म्हणाले आहेत.
शिक्षक दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला कुंवर विजय शाह गेले होते. आमचे सहकारी टाळ्या वाजवण्याऐवजी टाळ्या वाजवण्याचं नाटक करतात. गुरू देवापेक्षा मोठा असतो, त्यामुळे गुरूचा सन्मान करा. गुरूंसाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं वक्तव्य कुंवर विजय शाह यांनी केलं.
याआधी दही हंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गर्दीसमोर कोणतंही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असं सांगताना राम कदम यांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर करून टाकलाच... शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचं भान सुटलं... तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले, 'एखाद्या तरुणीला प्रप्रोज केलं आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा... मदत करणार... आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं... तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी?... तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार, असं राम कदम म्हणाले.