बॉस (Boss) आणि कर्मचारी (employe) यांच्यात वाद होण्याच्या घटना काही नवी नाही. काही वेळा हा वाद विकोपाला जातो आणि भलतचं काही तरी होऊन बसतं. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) सतना येथे घटला आहे. एका ड्रायव्हरला (Driver) बसमालकाने नोकरीवरून काढून टाकल्याने त्याला राग अनावर झाला. यानंतर रागावलेल्या ड्रायव्हरने बसच्या डिस्प्ले बोर्डवर (LED display board) स्वत:च्या मालकाविरुद्ध अपशब्द वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतनाहून इंदौरला जाण्यासाठी सज्ज असलेली बस (Bus) सुरू झाल्यावर बसच्या समोर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेमध्ये शिव्या दिसू लागल्या. यावेळी काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर (Social media) व्हायरल केला. 16 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. (Madhya pradesh driver hacked a display board to avenge being fired)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मध्य प्रदेश पोलिसांनी सलमान नावाच्या बस चालकाविरुद्ध बसच्या एलईडी डिस्प्ले बोर्डवरील स्क्रोलिंग मजकूर अपमानास्पद शब्दांत बदलल्याबद्दल गुन्हा नोंदवला. सुखेजा बस सर्व्हिसचे मालक सतीश सुखेजा यांच्याकडे सलमान हा सतना-इंदूर या बसवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मात्र सहा महिन्यांपूर्वी त्याला सतीश सुखेजा यांनी कामावरुन काढून टाकलं होतं. त्यानंतर मालकाला धडा शिकवण्यासाठी सलमानने असं कृत्य केल्याचे सतीश यांनी म्हटलं आहे.


सलमानने एलईडी डेस्टिनेशन दाखवणारा बोर्ड हॅक करत त्यामध्ये बदल केला आणि त्याजागी 'माद*** सुखेजा' असं लिहिलं. सतना बस स्टँडवर उभ्या असलेल्या या बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बस ड्रायव्हर किंवा सुखेजा ट्रॅव्हल्सच्या कर्मचार्‍यांना विंडस्क्रीनवर दिसत असलेल्या शिव्यांची माहितीच नव्हती. ही बातमी पसरताच बस सतीश सुखेजा यांनी डिस्प्ले काढून टाकण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणाची तक्रार सतना येथील कोलगाव पोलीस ठाण्यात केली. कंपनीचे व्यवस्थापक अनिलकुमार पाठक यांनी तक्रार दिली. सुखेजा कंपनीची प्रतिमा खराब करण्यासाठी सलमानने हे कृत्य केल्याचे पाठक यांनी तक्रारीत म्हटले आहे. बस क्रमांक MP19P7782 च्या डिस्प्ले बोर्डचा पासवर्ड फक्त सलमानकडे होता, असेही त्यांनी म्हटलं आहे. आरोपी गेल्या 5-6 महिन्यांपासून सुखेजा कंपनीत काम करत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 



दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी सलमान सतना येथे आला होता आणि बोनेटजवळ बसून त्याने डिस्प्लेमध्ये दिसणारी अक्षरे बदलली. तो काय करत होता हे कोणालाच माहीत नव्हते. त्यानंतर बस मुक्कामाच्या दिशेने निघाली तेव्हा कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. बस मालकाने व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने सलमानला फोन करून देवेंद्रनगरमध्ये बोलवून घेतलं होतं. मात्र आता या डिस्प्ले बोर्डवरील अक्षरे बदलण्यासाठी मालकाला 55,000 खर्च येण्याची शक्यता आहे.