नवी दिल्ली : मध्यप्रदेशात आज विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यात तरुण मतदारांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्नी साधना यांच्यासोबत आपल्या गावात जैतमध्ये मतदान केलं. यावेळी, मुख्यमंत्र्यांचा मुलगा कुणाल चौहान यानंदेखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.


मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन वेळा सत्तेत असणाऱ्या भाजपाची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात १० सभा घेऊन काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी राज्यात चौदा सभा घेतल्या आहेत. आपली खुर्ची टिकवण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी १४० हून अधिक सभा घेऊन मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे काँग्रेसनंही आपली सगळी ताकद पणाला लावून शिवराज सिंह चौहान यांचा पराभव करण्याचा विडा उचललाय.


राहुल गांधींनी राज्यात १२ जाहीर सभा घेऊन मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्या कारभारावर जहरी टीका केलीय. गेली अनेक वर्ष अंतर्गत गटबाजीनं ग्रासलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी यंदा एकजूट होऊन लढत असल्याचं चित्र जनतेसमोर उभं केलंय. त्यामुळे आता मतदार कुणाच्या पारड्यात दान टाकतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कुणाल

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी साडे सहाशे तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १ लाख ८० हजार पोलीस तैनात आहेत. तीन  नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. सॅटलाईट आणि वायरलेस यंत्रणाही सुरक्षा व्यवस्थेच्या कामासाठी वापरण्यात येत आहेत.