नवी दिल्ली : काँग्रेसमधून काढता पाय घेतल्यानंतर आणि बऱ्याच राजकीय नाट्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia यांनी अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नवी दिल्ली येथे जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांचं पक्षासाठीचं योगदान जास्त महत्त्वाचं असेल असा आशावाद नड्डा यांनी व्यक्त केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पक्षप्रवेशावेळी उपस्थित असणाऱ्या नड्डा यांच्यासह सर्वच पक्षश्रेष्ठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंधियांनी सहृदय आभार मानले. सोबतच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपण भावुक झाल्याचंही सांगितलं. काँग्रेसमधून काढता पाय घेणाऱ्या सिंधिया यांनी पक्षावर काही गंभीर आरोप केले. पक्षात नव्या नेतृत्त्वाला व्यक्त होण्याची संधी मिळत नसल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.


काँग्रेस पक्षातून भाजमध्ये जाणाऱ्या सिंधिया यांनी यावेळी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. 'जनसेवा हेच आपलं एकमेव लक्ष्य असावं यावर मी कायम विश्वास ठेवला आहे. मुळात त्यासाठी राजकारण हे लक्ष्यपूर्तीसाठीचं एक माध्यम असायला हवं', असं म्हणत आज मात्र परिस्थिती फार वेगळी असल्याची बाब त्यांनी मांडली. जनसेवेची लक्ष्यपूर्ती काँग्रेसमध्ये होत नसल्याचं सांगत आजच्या घडीला पूर्वीचा काँग्रेस पक्ष राहिला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. 



काँग्रेसकडून जनतेला दिलेली अनेक आश्वासनं पाळली गेली नसल्याचं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन कागदोपत्रीच असल्याचं सांगत तरुण पिढीत रोजगाराच्याही संधी नसल्याचं वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवलं. पक्षात मुळात रोजगाराला संधी नसली तरीही भ्रष्टाचाराला मात्र वाव आहे असं म्हणत त्यांनी यावेळी काँग्रेसला टोलाही लगावला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत त्यांनी भाजपला मिळालेल्या जनादेशीविषयीही वक्तव्य केलं. मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचवलं आहे. भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत त्यांनी या आव्हानांचा सामना करण्याचीही तयारी दाखवली आहे, हेच सांगत भारताचं भविष्य सुरक्षित हाती असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.