आणखी एका राज्यात काँग्रेसला दणका; १७ आमदार `नॉट रिचेबल`
धक्कादायक माहितीही समोर
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय पटलावर अनेक हालचाली सुरु असतानाच आता आणखी एका राज्यातून काँग्रेसला दणका मिळणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. याच धर्तीवर पुन्हा एकदा राजकीय डावपेच आणि नेतेमंडळींमध्ये असणारी धुसफूस समोर आली आहे.
सोमवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुनच आपण पुढील निर्णय़ घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या साऱ्यातच ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक गटातील काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरूत असून, चार मंत्र्यांशीही कोणताही संपर्क झाला नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहत असल्याची बाब आता स्पष्ट होत आहे.
दरम्यान, गांधी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रश्नावर मात्र कमलनाथ यांनी मौन पाळलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये सत्तेची एकंदर समीकरणं पाहता कमलनाथ सरकारच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. एकिकडे आपल्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी मध्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे ज्योतिरादित्य समर्थक गटाचत्या आमदारांनी मात्र त्यांचे फोन बंद केले आहेत. काहींनी अज्ञात स्थळी जात, तर काहींनी स्वत:च्याच घरात बंदिस्त होत या सर्व प्रकरणावर मौन पाळलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राज्यसभा वारीच्याच मुद्द्यावरुन ही राजकीय उलथापालथ सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
खालील व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही
गिर्राज दंडोतिया, कांग्रेस- दिमनी (मुरैना)
कमलेश जाटव, कांग्रेस - अम्बाह (मुरैना)
यशवंत जाटव, कांग्रेस - करेरा (शिवपुरी)
इमरती देवी, महिला व बाल विकास मंत्री (ग्वाल्हेर)
प्रद्युम्न सिंह तोमर, मंत्री (ग्वालियर)
गोविंद सिंह राजपूत, परिवहन मंत्री- सुरखी (सागर)
ओपीएस भदोरिया, कांग्रेस - मेहगाव (भिण्ड)
रघुराज सिंह कंसाना, कांग्रेस - मुरैना, याशिवाय जसपाल सिंह जग्गी, बृजेंद्र सिंह यादव यांच्याशीही कोणत्याही प्रकारचा संपर्त झालेला नाही.
कमलनाथ- सोनिया गांधी यांच्या दिल्ली भेटीत नेमकं काय झालं?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत कमलनाथ यांनी त्यांच्याशी मध्य प्रदेशातील स्थितीविषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते. गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सत्तेत असताना भाजपक़डून ज्याप्रमाणे अनेक गोष्टींची लूट केली गेली आहे याची पोलखोल होण्याचीच भीती आता त्यांना लागून राहिली आहेत, असंही ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.