५७ हजारांची चिल्लर देऊन त्यानं विकत घेतली बाईक!
`थेंबे थेंबे तळे साचे`... हाच मंत्र ध्यानात ठेऊन मध्यप्रदेशातील एका सामान्य व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण केलंय.
नवी दिल्ली : 'थेंबे थेंबे तळे साचे'... हाच मंत्र ध्यानात ठेऊन मध्यप्रदेशातील एका सामान्य व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण केलंय.
मध्यप्रदेशच्या रायसिन शहरात एक छोटं दुकान चालवणाऱ्या हसीब हिंदुस्तानी यांची ही कहाणी... बाईक खरेदीसाठी गेल्या तीन वर्षांपासून ते पै ना पै जोडत होते.
'स्प्लेंडर' ही बाईक विकत घेण्यासाठी हसीब यांनी तब्बल ५७ हजारांची चिल्लर शो रुम मालकाच्या समोर आणून ठेवली... एवढी मोठी चिल्लर पाहून शोरूमच्या मालकालाही धक्का बसला.
ड्रीम बाईकची खरेदी
पहिल्यांदा तर शोरूम मालकानं हे पैसे घेण्यासाठी सरळ नकार देऊन टाकला... पण, हसीब यांच्या इच्छेसमोर त्यांना हात टेकवावे लागले. ही एवढी मोठी चिल्लर मोजण्यासाठी शोरूममधला सगळा स्टाफ कामाला लागला होता. हे पैसे मोजण्यासाठी त्यांनी तब्बल तीन तास खर्ची घातले. हसीब यांच्या बॅगेतून १० चे ३२२ नाणी, ५ चे १४५८ नाणी, दोनचे १५६४५ नाणी आणि एकचे १४६०० नाणी निघाली.
पंतप्रधान मोदींकडून मिळाली प्रेरणा
एक-एक नाणं जोडण्याची प्रेरणा आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भाषणातून मिळाल्याचं हसीब यांनी म्हटलंय. तेव्हापासूनच त्यांचे कुटुंबीय एक-एक पैसा जोडू लागले होते.