लग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत
Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं लग्न झालं आणि ईडीने वेगाने तपास सुरु केला. खरं तर या प्रकरणाला तोंड या लग्नानंतरच फुटलं.
Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीनं चौकशीसंदर्भातील समन्स पाठवले आहेत. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. महादेव अॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता असून या यादीमध्ये 1 डझनहून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे. सनी लिओनीसह भाग्यश्री, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, बोमन इराणी, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण दुबईमधील एका आलिशान लग्नाला गेल्याने अचानक चर्चेत आले आणि तिथूनच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. या लग्नामध्ये 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे लग्न होतं सौरभ चंद्राकरचं. ज्या सौरभ चंद्राकरच्या लग्नाला जाऊन अनेक सेलिब्रिटी अडकलेत तो आहे तरी कोण पाहूयात...
महादेव अॅप काय आहे?
महादेव अॅप हे ऑनलाईन बेटिंग म्हणजेच सट्टेबाजीसंदर्भातील अॅप आहे. या अॅपद्वारे मनीलॉण्ड्रींग म्हणजेच बेकायदेशीरपणे कोट्यवधींचे रोख व्यवहार केले जात असल्याचा संशय असून ईडीकडून कारवाई सुरु आहे. या कारवाईत आतापर्यंत 417 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने भोपाळ, कोलकाता आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.
सौरभ चंद्राकर कोण?
महादेव अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याने युएईमध्ये स्वत:चं साम्राज्य उभं केलं आहे. दुबईतून हे बेटिंग अॅप चालवलं जातं. पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन सट्टा बाजाराच्या माध्यमातून सौरभ चंद्राकारने कोट्यवधींची माया गोळा केली आहे. चंद्राकार मुळचा भारतातल्या छत्तीसगडमधल्या भिलाई इथला आहे. सौरव चंद्राकारने रवी उप्पल नावाच्या साथीदारासह ऑनलाईन बेटिंग अॅप सुरु केलं. या अॅपला त्याने महादेव असं नाव दिलं. या अॅपचा टर्नओव्हर जवळपास 20,000 कोटींचा आहे.
सौरभ चंद्राकरला होतं व्यसन
भिलाईमध्ये महादेव नावाचं सौरभ चंद्राकारचं एक छोटसं ज्यूस सेंटर होतं. त्यावेळी सौरभला स्वत: ऑनलाईन सट्टा लावायचा. यामध्ये त्याला 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. बेटिंगमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि वसुलीसाठी तगादा लागला. त्यामुळे चंद्रकार आणि रवी उप्पल दुबईला पळून गेले.
लोकप्रिय झालं अॅप
दुबईमध्ये सुरुवातील दोघांनी लहान-सहान काम करत थोडेफार पैसे जमवले आणि त्यातून स्वत:चं महादेव बूक अॅप नावाचं ऑनलाईन बेटिंग अॅप सुरु केलं. काही काळातच हे अॅप लोकप्रिय झालं. लाखो लोकांनी या अॅपवरुन ऑनलाईन बेटिंग केली. भारतात या अॅपवर बंदी असली तरी इतर काही देशांमध्ये हे अॅप सुरु आहे. या अॅपचे नेटवर्क नेपाल, बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये पसरलं आहे.
आलिशान लग्न
सौरभ चंद्राकारने दुबईमध्ये यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात शाही विवाह केला. स्वत:च्या लग्नासाठी सौरभने जवळपास 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केली. या लग्नाची जगभरात चर्चा झाली. भारतात राहाणाऱ्या नातेवाईकांना दुबईत आणण्यासाठी त्याने चक्क प्रायव्हेट जेट बूक केले होते. तसेच डान्सर, डेकोरेटरही त्याने खास भारतातून दुबईत आणले होते. याशिवाय या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. काही कलाकारांनी या लग्नामध्ये परफॉर्मन्सही दिला.
लग्नातील या सर्व गोष्टींसाठी झालेला खर्च हा थेट रोख रक्कम स्वरुपात सौरभने दिल्याने तो तपास यंत्रणांच्या रडारखाली आला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकारही हे अॅप प्रमोट करण्यासाठी आणि या लग्नाला उपस्थित राहिल्यासाठी ईडीच्या रडारमध्ये आले.
लग्न झालं त्याच महिन्यात ईडीची कारवाई
ईडीने फेब्रुवारी महिन्यामध्ये कोलकाता, भोपाळ आणि मुंबईमध्ये कारवाई केल्यानंतर, "महादेव अॅपसंदर्भात मनीलॉन्ड्रींगच्या संशयामुळे कोलकाता, भोपाळ आणि मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही छापेमारी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, पुरावे सापडले. गुन्हेगारी माध्यमातून कमवलेली 417 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे किंवा गोठवली आहे," असं ट्वीट केलं होतं.
आता या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. महादेव अॅप घोटाळा हा 5 हजार कोटींहून अधिकचा असल्याचं सांगितलं जात आहे.