लखनऊ: बसगाव हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरुवारी आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर त्यांची गाडी अडवली. आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी ठिय्या मांडला आहे. बांसा गावात जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे नितीन राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.



उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीवर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी झाल्यापासून त्यांनी स्थानिक प्रश्न उचलून धरले आहेत. यापूर्वी प्रियंका गांधी यांनाही अशाप्रकारे अडवण्याचा प्रयत्न झाला होता. काँग्रेसच्या नेत्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या खून आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. काँग्रेसकडून याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच नितीन राऊत आझमगढ येथे गेले होते. मात्र, एका मंत्र्याला अशाप्रकारे पोलिसांनी अटक करणे ही निषेधार्ह कृती असल्याचे राजीव सातव यांनी सांगितले.