8 दिवस, 70 रुम आणि अलिशान सुविधा, पाहा गुवाहाटीत बंडखोर आमदारांवर किती खर्च झाला
महाराष्टातील बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये अलिशान रुमची व्यवस्था करण्यात आली होती
Maharashtar Politics : गुवाहाटी इथल्या रेडिसन ब्ल्यू या आलिशान हॉटेलमध्ये आठ दिवस तळ ठोकून बसलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदार यांनी बुधवारी हॉटेल सोडलं. त्यापूर्वी त्यांनी आठ दिवसांचं बिल चूकतं केलं.
आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हॉटेलच्या वेगवेगळ्या मजल्यांवर एकूण 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. 22 जून ते 29 जून या कालावधीत हे सर्व जण या हॉटेलमध्ये थांबले होते. विशेष म्हणजे या काळात इतर लोकांसाठी रेस्टॉरंट, जेवण आणि इतर सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटीतल्या गोटानगर इथल्या अलिशान रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये राहण्यासाठी 68 ते 70 लाख रुपयांचं बिल चुकतं करण्यात आलं आहे. हॉटेलचे अधिकारी मात्र यावर मौन बाळगून आहेत.
हॉटेलमधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की महाराष्ट्रातील आमदार सामान्य पाहुण्यांप्रमाणे हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी जाण्यापूर्वी हॉटेलची बिलं भरली आहेत. एकही पैसा प्रलंबित नाही.
आमदारांसाठी सुपीरियर आणि डिलक्स क्लास रूम
आमदारांसाठी 'सुपीरियर आणि डिलक्स क्लास' रूमची व्यवस्था करण्यात आली होती. पण हॉटेल व्यवस्थापनाने भरलेल्या रकमेचा तपशील सांगण्यास नकार दिला. सुपीरियर रूमचं भाडे 7,500 आणि डिलक्स रुम्सचे भाडं 8500 प्रतिदिन आहे. सूट आणि करानंतर हा आकडा सुमारे 68 लाख रुपयांचा असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 22 जूनच्या सकाळपासून मुंबईपासून सुमारे 2700 किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीमध्ये हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये थांबले होते. ते बुधवारी गोव्याला रवाना झाले.