मुंबई : कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर माहिती दिली आणि काही मागण्या ही केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. 


हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असेही ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, गेल्या सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामूळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे.'


मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत.  आजपर्यंत ९२  ते ९५  लाख  डोस  देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. 
१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामूळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे.  


२५ वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे या मागणीचा पुनरुचार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.   


राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पहाता १७००-२५०० मे. टन इतक्या ऑक्सीजनची एप्रिल अखेरपर्यतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे. अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली.