तुमच्या खिशातल्या नोटेवरील गांधीजींचा फोटो कुठून आला ?
नोटेवरील गांधीजींचा फोटो कुठून आला ?
नवी दिल्ली : राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त बापुजींच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आज वाचायला मिळतायत. अशीच एक कहाणी आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय चलनाची ओळख म्हणून गांधीजींचा फोटो आपण पाहतो. पण तुम्हाला माहितेय का हा फोटो कुठून आला ? काय विचार करुन देशातील सरकारने आणि आरबीआयने हा फोटो वापरला असावा ? याबद्दल आपण माहिती घेऊया..
चलन ट्रेडमार्क
भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो पाहायला मिळतो. हा आपल्या चलनाचा ट्रेडमार्क आहे. पण हा फोटो कुठून आला ? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. हा केवळ पोट्रेट नाही तर गांधीजींचा फोटो आहे. फोटोतून गांधीजींचा चेहरा पोट्रेट स्वरुपात घेतला गेला.
कुठून आला फोटो ?
गांधीजींनी त्यावेळी भारतामधील तत्कालीन ब्रिटीश सेक्रेटरी असणाऱ्या फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांची भेट घेतली होती. कोलकाता येथील वायसराय हाऊसमध्ये ही भेट झाली होती. यावेळच्या काढलेल्या फोटोतील गांधीजींचा चेहरा पोट्रेट रुपात भारतीय नोटांची विशेष ओळख बनला.
रिझर्व बॅंकांनी केला बदल
आज आपण भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो पाहतो. पण याआधी नोटांवर केवळ अशोक स्तंभ दिसायचा. रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने १९९६ साली नोटांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक स्तंभाची जागा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोने घेतली तर उजवीकडे खालच्या बाजूस अशोक स्तंभ दिसू लागला.
आतापर्यंत ५ रुपयांपासून १ हजारपर्यंत नोटांवर गांधीजींचा फोटो पाहायला मिळतो. याआधी १९८७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा पाचशेच्या नोटेवरील गांधीजींचा फोटो वापरण्यात आला त्यावेळी वॉटरमार्क देण्यात आला होता. १९९६ नंतर प्रत्येक नोटवर गांधीजींचा फोटो दिसू लागला.
१ रुपयाची नोट भारत सरकार तर २ रुपयांपासून ते २ हजारांपर्यंतचे चलन आरबीआयतर्फे जारी केली जाते. दोन रुपयांची नोट बंद असून इतर जुन्या नोटा आजही चलनात आहेत.
किंग्ज जॉर्जचा फोटो
याआधी नोटेवर किंग जॉर्ज यांचा फोटो असायचा. भारतीय रुपया १९५७ पर्यंत १६ आण्यांमध्ये होता. यानंतर १ रुपया शंभर पैशांमध्ये मोजला जाऊ लागला. महात्मा गांधींचा फोटो असणाऱ्या नोटांची सुरुवात १९९६ पासून झाली जे आतापर्यंत चलनात आहेत.