`महुआ मोईत्रांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी मला...`; व्यावसायिकाच्या आरोपांनी एकच खळबळ
Mahua Moitra : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी संसदेच्या आचार समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आणि दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केला आहे.
Questions For Money Scandal : भाजपा (BJP) नेते निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात. मोईत्रा यांनी अदाणी समूहावरून (Adani Group) संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, असा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. त्यानंतर आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पैशासाठी प्रश्न घोटाळ्यात खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी कबुलीजबाब देत अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याची कबुली दिली आहे.
महुआ यांना राजकारणात वेगाने पुढे जायचे होते, असे उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी म्हटलं आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी गौतम अदानी यांना लक्ष्य केले, असा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. हिरानंदानी यांनी हे प्रश्न मोहुआ मोईत्रांसाठी संसदेच्या वेबसाइटवर अपलोड केल्याचे मान्य केले. याप्रकरणी खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहित महुआ मोईत्रा यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या व्यावसायिक हितासाठी पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महुआ मोईत्रांनी पासवर्ड आणि आयडी दिला
महुआ मोईत्रा यांना राजकारणात पुढे जायचे होते, अशी कबुलीही दर्शन हिरानंदानी यांनी दिली आहे. याच उद्देशाने त्याने महुआ मोइत्राचा वापर करून अदानी समूहाला लक्ष्य केले. हे प्रश्न अपलोड करण्यासाठी महुआने संसदेच्या अधिकृत वेबसाइटचा आयडी आणि पासवर्ड आपल्यासोबत शेअर केल्याची कबुली हिरानंदानी यांनी दिली.
महुआ मोईत्रांचे स्पष्टीकरण
महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे. महुआ यांनी हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे आरोप श्वेतपत्रिकेवर आहेत आणि अधिकृत लेटरहेड किंवा नोटरीकृत पत्रात नाहीत. प्रतिज्ञापत्रातील मजकूर विनोदी आहे. पंतप्रधान कार्यालयाने मला लक्ष्य करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, भाजप सरकार अदानी प्रकरणावर मला शांत करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. दर्शन हिरानंदानी यांना पंतप्रधान कार्यालयाने प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले आहे, असे मोईत्रा यांनी म्हटलं आहे.