आमच्या चुका दाखवा, पण लोकांना जागरुकही करा- नरेंद्र मोदी
अर्थव्यवस्थेला ३ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठायला ७० वर्षे का लागली, असा प्रश्न मोदींनी विचारला.
नवी दिल्ली: देशातील प्रसारमाध्यमांनी जनतेसमोर सरकारच्या चुका जरुर दाखवाव्यात. मात्र, त्याचवेळी जनतेला जागरुक करा आणि दिशा देण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'टाइम्स नाउ समिट'मध्ये बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि करप्रणालीच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्थेची उलाढाल ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणे सोपे नाही. मात्र, ही गोष्ट शक्य आहे. गेल्या ७० वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार फक्त ३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत मर्यादित राहिला. परंतु, हे लक्ष्य गाठण्यासाठी इतका वेळ का लागला, हा प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही. मात्र, आमचे सरकार ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.
यावेळी मोदींनी भारतीय करप्रणालीत झालेल्या सुधारणांचाही उल्लेख केला. भारत असा देश आहे की ज्याठिकाणी करदात्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चार्टर लागू करावे लागते. जगातील श्रीमंत देशांमध्ये करदात्यांसाठी असे कोणतेही चार्टर नाही. मात्र, भारत सरकार करदात्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारपणे पावले उचलत आहे. त्यामुळे करावरून होणारी छळवणूक ही गोष्ट इतिहासजमा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारने गेल्या आठ महिन्यांमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेखही केला. गेल्या ८ महिन्यांत सरकारने निर्णयांचे शतक साजरे केल्याचे त्यांनी सांगितले.