काँग्रेस-जेडीएसमध्ये सत्तेवरुन वाद होण्याची शक्यता
कर्नाटकातील सत्ता संघर्ष अजून बाकीच....
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये 4 दिवस सत्ता संघर्ष चालल्यानंतर ते आता संपेल असं अजिबात वाटत नाही. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस आता सहज सत्ता स्थापन करतील असं वाटत होतं पण अजून बरंच काही बाकी आहे. सरकारचं स्वरूप कसं असेल यावर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदं याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. फक्त मुख्यमंत्री जेडीएसचे कुमारस्वामी होणार ऐवढंच निश्चित आहे.
कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचे आणखी काही पत्ते बाहेर येणे बाकी आहे. काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील सरकार स्थापनेचा तिढा किती लवकर सुटतो हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या एका वक्तव्याने कर्नाटकमधील सत्ता संघर्ष अजून वाढणार असं दिसतंय. 'सत्तेचा निर्णय हायकमांड करतील असं त्यांनी म्हटलं आहे. आमचा एक राष्ट्रीय पक्ष आहे. जेडीएसला आम्ही समर्थन दिलं आहे. जो एक प्रादेशिक पक्ष आहे. सर्व मूल्य लक्षात घेता आम्ही या गोष्टीकडे अधिक भर देऊ की आम्हाला सत्तेत तसाच भाग मिळावा.'
याआधी मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जेडीएसच्या 37 पैकी 20 आमदारांना मंत्रीपदं दिली जातील. तर काँग्रेसच्या 78 पैकी 13 आमदारांना मंत्रीपदं दिली जातील. यामुळे काँग्रेस आता हा फॉर्म्यूला मान्य करतो की याला विरोध करतो हे पाहावं लागेल. कुमारस्वामी सोमवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.