नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाच्या शपथविधीस उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना त्यांनी ट्वीट करत पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान मोदी मला शपथविधी सोहळ्यास न जाण्यास भाग पाडत आहेत. लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात जीव गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या परिवाराला देखील पंतप्रधानांनी आमंत्रित केले आहे. असे करुन भाजपा शपथ ग्रहण विधीचे राजकारण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 मे रोजी पंतप्रधानपदाचा शपथविधी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यावेळी एनडीएतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच ममता बॅनर्जी या देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. शपथ ग्रहण विधीसाठी मला आमंत्रण असून संविधानिक शिष्टाचाराच्या नाते मी जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.  



लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने यंदा चांगलं यश मिळवलं आहे. यानंतर मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल काँग्रेसचे २ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे आज भाजपचं कमळ हातात घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी ४ वाजता भाजपच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागातील जवळपास ५० नगरसेवकांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सर्व नगरसेवक कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती नगरपालिकेचे आहेत. सोबतच भाजपची भाटपारा नगरपालिकेवर सत्ता येणार आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह भाटपारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत.