कोलकाता : देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला. कोलकात्यातल्या संयुक्त भारत मेळाव्यातली नजरेच्या टप्प्यात न मावणारी गर्दी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मनोबल वाढवणारी ठरली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या संयुक्त भारत मेळाव्यासाठी लाखोंचा जनसागर गोळा झाला होता. तर व्यासपीठावर देशभरातल्या सगळे मोदीविरोधकांची एकजूट पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी, अरविंद केजरीवाल, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, अखिलेश यादव, गेगांग अपांग, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आदींसह दिग्गज नेते एकाच मंचावर दिसून आलेत. सत्तेसाठी आणि पदासाठी नाही तर जनतेसाठी विरोधक एकत्र आल्याचं शरद पवारांनी सांगितले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. केंद्रातील मोदी सरकारची समाप्तीची तारीख संपली आहे. केंद्रातून भाजप पर्यायाने मोदी सरकार जाणार आहे. भाजपने राजनितीक शिष्टाचार पायदली तुडवले आहेत. ते राजशिष्टाचार पाळत नाहीत. भाजप लोकांसोबत नाही. भाजपला आता चोर म्हणून हिनवले जात आहे. त्यांच्यावर ही वेळ का आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



'यूपी, पश्चिम बंगालमध्ये भाजप शून्य?'



भाजपच्या आरोपांचा समाचार घेत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जनता ठरवेल असे सांगितले. अखिलेश यादव आणि मायावतीच्या यूपीतल्या आघाडीचा संदर्भ देत तुम्ही यूपीत शून्य करा आम्ही पश्चिम बंगालमध्ये शून्य करतो, असा इशारा ममतादीदींनी सरकारला दिला. दिल्लीचे अरविंद केजरीवाल आणि काश्मीरच्या अब्दुला पितापुत्रांपासून आंध्रच्या चंद्राबाबू नायडूंपर्यंत सगळे विरोधक एका मंचावर पाहायला मिळाले. शत्रुघ्न सिन्हांनी धडाकेबाज भाषण ठोकून टाळ्या गोळा केल्या. एकंदर मेळाव्याची गर्दी पाहता हा मेळावा विरोधकांचं मनोबल वाढवणारा ठरला.


लोकशाहीच्या विरोधात निर्णय - यशवंत सिन्हा


आपला प्रश्न पंतप्रधानांपुरता मर्यादीत नाही. विचारधारेशी आहे. गेल्या 56 महिन्यात जे काही झाले ते भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने किती धोकादायक होते हे आपण पाहिले आहे. यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. अनेकांना बर्बाद केले. समाज तोडण्याचा, छिन्न विछिन्न करण्याचा यांचा इरादा आहे. तुम्ही या सरकारला विरोध केला तर तुम्हाला देशद्रोही ठरवतात, असा घणाघात यशवंत सिन्हा यांनी विरोधकांच्या व्यासपीठावरुन भाजपवर केला.


 ‘चौकीदार चोर है’ हेच ऐकावेच लागेल'



'जोपर्यंत तुम्ही खरी उत्तरे दडवून ठेवण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्हाला जनतेकडून ‘चौकीदार चोर है’ हेच ऐकावेच लागेल' असे सांगत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. एका बाजूला नोटाबंदी आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी हे म्हणजे कडुलिंबावर कारले, अशी परिस्थिती झाली असल्याचे शत्रुघ्न म्हणालेत.



यावेळी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची उपस्थितीही लक्षवेधक ठरली. यावेळी हार्दिक पटेल यांनी जोरदार टीका केली. तर साडेचार वर्षांमध्ये दलित, शेतकरी, मध्यमवर्गीयांचे शोषण झाल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे महत्व संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्याने सांगितले.