विद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!
बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
बंगळुरू : बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
बंगळुरूच्या शांबिहाना हल्ली भागात ही घटना घडल्याचं समजतंय. या घटनेत शिक्षिका ५० टक्के भाजलीय. सुनंदा असं या ५० वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे.
गावातील प्राथमिक शाळेत सुनंदा शिकवत होती. त्याचवेळी रेनुकाराध्य नावाचा इसम शाळेत दाखल झाला... आणि पाहाता पाहताच त्यानं विद्यार्थ्यांसमोरच सुनंदावर पेट्रोल फेकलं आणि आग पेटवून दिली.
सुनंदाचा आवाज ऐकल्यानंतर तात्काळ तिचे सहकारी आणि आजुबाजुचे रहिवासी शाळेत दाखल झाले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ ही आग विझवली... आणि सुनंदाला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल केलं.
या घटनेत सुनंदाचा चेहरा, मान, हात आणि इतर भाग ५० टक्के जळालाय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मगाडी पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.