Manipur Voilence : मणिपूर (Manipur) हिंसाचाराचा मुद्दा सध्या सगळ्या जगभरात पेटला आहे. जागतिक स्तरावर या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी सुद्धा मोदी सरकारला या मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. दुसरीकडे पंतप्रधानांकडून (PM Modi) यावर योग्य तो तोडगा निघेल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. अशातच अमेरिकेन गायिका मेरी मिलबेन (Mary Millben) हिने सुद्धा मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे. ईशान्येकडील राज्यातील जनतेसाठी पंतप्रधान नेहमीच लढत राहतील, असे मेरी मिलबेन यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणानंतर लगेचच मेरी मिलबेन यांनी हे विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय गायिका मिलबेन यांनी या वर्षी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. जन गण मन हे भारतीय राष्ट्रगीत गाल्यानंतर मिलबेन यांनी मोदींच्या पायांना स्पर्शही केला होता. 'जन गण मन' आणि 'ओम जय जगदीश हरे' हे राष्ट्रगीत गाण्यासाठी मिलबेन भारतात खूप लोकप्रिय आहेत. 21 जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात ननव्या आंतरराष्ट्रीय योग दिनात त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत भाग घेतला. त्यानंतर आता संसदेत पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर मुद्द्यावरुन भाष्य केल्यानंतर मिलबेन यांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


"सत्य हे आहे की भारताला आपल्या नेत्यावर विश्वास आहे. भारतातील मणिपूरच्या माता, मुली आणि महिलांना न्याय मिळेल. पंतप्रधान मोदी तुमच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच लढत राहतील. विरोधकांच्या आवाजाला आधार नाही. ते कोणत्याही तथ्याशिवाय जोरात ओरडतील. पण सत्य हे आहे की सत्य नेहमीच लोकांना मुक्त करते," असे मेरी मिलबेन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शेवटी मिलबेन यांनी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या शब्दात, भारतात स्वातंत्र्याची घंटा वाजू द्या. पंतप्रधान मोदी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, असं म्हटलं आहे.



मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी काय म्हणाले?


पंतप्रधान मोदींनी संसदेत विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाला ते दोन तास उत्तर देत होते. मणिपूरमधील हिंसाचाराला संबोधित करताना, त्यांनी या राज्याचे हृदयाचा तुकडा असे वर्णन केले आणि आश्वासन दिले की राज्यात शांतता निर्माण केली जाईल. "मणिपूरमध्ये महिलांविरोधात घृणास्पद गुन्हे घडले आहेत. हे अक्षम्य आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. मी मणिपूरच्या जनतेला विनंती करतो आणि मला मणिपूरच्या महिलांना सांगायचे आहे की देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. या आव्हानावर आपण एकत्र येऊन तोडगा काढू आणि तिथे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होईल," असे पंतप्रधान म्हणाले.