इंफाळ : देशातील विविध राज्यांतून आणि देशातून राज्यात येणाऱ्या लोकांना आयसोलेशनमध्ये राहणं अनिवार्य असल्याचे, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सांगितले आहे. बाहेरील राज्यातून आलेले लोक आयसोलेशनमध्ये न राहिल्यास किंवा आयसोलेशनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूरला कोरोनामुक्त घोषित केल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर येथे पुन्हा रुग्णांची संख्या वाढली असून ती 25वर पोहचली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिंह म्हणाले की, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार शिक्षा देण्यात येण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 


हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे इतर राज्यातून मणिपूरमध्ये येणाऱ्या सर्वांना नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. जे नियमांचं पालन करणार नाहीत, अशांना जेलमध्ये पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


विदेशातून आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. ज्या लोकांना घरातच आयसोलेशनमध्ये राहणं शक्त नाही, अशा लोकांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. सामुदायिक स्तरावर या संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखणं, हे मुख्य ध्येय असल्याचे, ते म्हणाले. 


मणिपूरमध्ये सुरुवातीला 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, 19 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झाल्याचं घोषित केलं. देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर देशातील इतर भागात अडकलेल्या मणिपूरच्या लोकांनी राज्य सरकारला, राज्यात परत येण्यासाठी विनंती केली. सरकारने मणिपूरबाहेर अडकलेल्या लोकांना ई-पासद्वारे राज्यात येण्याची परवानगी देत, अडकलेल्या लोकांना राज्यात आणण्यासाठी ट्रेन, बसेसची व्यवस्था केली. मात्र त्यानंतर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.