पुढील 3 महिन्यांसाठी `मन की बात` कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण
No Mann Ki Baat For Next 3 Months: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज `मन की बात`चा हा 110 वा भागातून देशातील जनतेबरोबर संवाद साधला. याचदरम्यान त्यांनी पुढील 3 महिने हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार नसल्याचं सांगितलं. मोदींनी यामागील कारणही सांगितलं.
No Mann Ki Baat For Next 3 Months: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या लोकप्रिय 'मन की बात' कार्यक्रमामधून भारतीयांशी संवाद साधला. यावेळेस पंतप्रधानांनी ड्रोन दीदींबरोबर गप्पा मारल्या. याच पार्श्वभूमीवर मोदींनी सध्या नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचंही म्हटलं. 'काही दिवसांनंतर म्हणजेच 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा करणार आहोत. हा खास दिवस देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या महिलांना सॅल्यूट करण्याची संधी उपलब्ध करुन दोतो. महान कवी भरतियार यांनी महिलांना समान संधी दिली तरच जग विकास करेल, असं म्हटलं होतं,' असा संदर्भही पंतप्रधान मोदींनी दिला. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा हा 110 वा भाग होता. मात्र आता या पुढे पंतप्रधान मोदी 3 महिने 'मन की बात'मधून लोकांशी संवाद साधणार नाहीत. त्यांनीच यामागील कारण सांगितलं आहे.
महिला महत्त्वाची भूमिका बजावणार
'आज भारताची नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचं नवं शिखर गाठत आहे. आज तर गावागावात ड्रोन दीदीची चर्चा आहे. प्रत्येकाच्या तोंडी नमो ड्रोन दीदी, नो ड्रोन दीदीचं नाव आहे. हे नमो ड्रोन दीदी देशातील शेतीला आधुनिक बनवण्यासाठी एक मोठं माध्यम ठरु शकतं,' असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. रासायनिक पदार्थांमुळे आपल्या धरती मातेला त्रास होतो. आपल्या धरती मातेला होणारा हा त्रास आणि पीडा कमी करण्यामध्ये देशातील मातृशक्ती मोठी भूमिका बजावू शकते, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत. डिजीटल गॅजेट्सच्या मदतीने आता वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवता येणार आहे याचा तुम्ही विचार करु शकता का? तुम्हाला हे जाणून आनंद होईल की सध्याही आपल्या देशात वेगवेगळ्या भागांमध्ये प्राण्यांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जातो, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
वन्यजीव आणि निसर्गाशी एकरुप होऊन राहणे
आज तरुण उद्योजक वन्यजीव संरक्षण आणि इको टुरिझमच्या माध्यमातून रोज नवीन नवीन शोध समोर आणत आहेत. निसर्गाबरोबर ताळमेळ राखण्याची आपली संस्कृती आहे. आपण हजारो वर्षांपासून निसर्ग आणि वन्य प्राण्यांबरोबर सह-अस्तित्वाची भावना जागृक ठेऊन राहत आलो आहोत, अशी आठवणही पंतप्रधानांनी करुन दिली.
पुढील 3 महिने 'मन की बात'
पंतप्रधान मोदींनी आपल्याला 'मन की बात' या मासिक कार्यक्रमामध्ये पुढील 3 महिने आपण या माध्यमातून संवाद साधू शकणार नाही असंही सांगितलं. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू होईल, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. याच कारणामुळे पुढील 3 महिने या कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.