मनोहर पर्रिकर विशेष विमानानं गोव्यात दाखल
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय. पर्रिकर यांना १५ सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र त्यानंतर तपासणीअंती त्यांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुढले काही दिवस पर्रिकर पणजीमधल्या त्यांच्या खासगी निवासस्थानी राहतील, अशी माहिती आहे. पर्रिकरांनी शनिवारीच गोवा भाजपा कोअर कमिटीची एम्समध्येच बैठक घेतली होती. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी भाजपानं मात्र ही शक्यता फेटाळली आहे. दरम्यान, पर्रिकरांना रुग्णालयातून सोडल्याच्या वृत्तावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा प्रथम विश्वास बसला नाही. कदाचित ते आराम करण्यासाठी गोव्यात येत असतील आणि त्यांच्यावर इथंच पुढले उपचार केले जातील, असं नाईक म्हणाले.