नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून आता दिल्लीतही खल सुरु झालाय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मराठा आरक्षणाची गंभीर दखल घेतलीय. येत्या बुधवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काँग्रेस नेत्यांची खास बैठक बोलावण्यात आलीय. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाची धग राजधानी दिल्लीतही पोहोचलीय.. एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यघटना दुरूस्तीची भूमिका घेतल्यानं, आता काँग्रेसलाही खडबडून जाग आलीय. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि भारत भालके यांनी याप्रकरणी आमदारकीचा राजीनामा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत विचारमंथन करण्यासाठी राहुल गांधींनी आता बुधवारी महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीत पाचारण केलंय... 
या बैठकीला आमदारांसह काँग्रेसचे ५१ नेते उपस्थित राहणार आहेत. याबाबत विभागवार नेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणाराय. या मुद्यावरून आमदारांसोबत खासदारांनीही राजीनामा द्यावा का, याबाबत यावेळी चर्चा करण्यात येणाराय.



 याआधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या राजवटीत मराठा आरक्षण देण्यात आले होते. मात्र तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. आता त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरू झालीय.. काँग्रेसची ही बैठक त्याचाच एक भाग मानली जातेय. दलित आणी अल्पसंख्यांकाचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसला आता मराठा आरक्षणासंदर्भातही केंद्रीय पातळीवर भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राहुल गांधी घटनेत बदल करण्याची मागणी संसदेत करणार की रस्त्यावर उतरून राजकारण करणार, हे स्पष्ट होईल.