रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून जात असल्याचा अनुभव पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाला आला आहे. केंद्रात सध्या घाम गाळणा-या मंत्र्यांची गरज आहे. पहिल्या पाच वर्षात विकासाची कामे करून दाखविली तरच जनता पुन्हा एकदा मोदींच्या झोळीत मते टाकणार आहेत. या परिक्षेत महाराष्ट्रातील मंत्री अव्वल गुणांनी पास झाल्याचे दिसतेय. केंद्रीय मंत्रालयात असलेल्या मराठी मंत्र्यांची कामगिरी चांगली असल्यामुळेच ते मंत्रीमंडळात कायम राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. नितीन गडकरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे २०१९ च्या निवडणूकीत दाखवण्यासारखे केवळ नितीन गडकरी यांच्या खात्याचे काम आहे. गडकरी यांनी धडाडीने राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपूलाचे काम हाती घेतले. २०१९ च्या पूर्वी ४०० प्रकल्प उद्घाटन करण्याची योजना आखली आहे. शिपींगमध्येही व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने गडकरी यांनी काम केले आहे. त्यामुळे गडकरींवर जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. 


२. प्रकाश जावडेकर : जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे. नवीन शैक्षणिक धोरण आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवीन मंत्रालय असले तरी जावडेकर यांच्यावर अद्याप कोणताही आरोप नाही, ही जमेची बाजू आहे. सरकार विरोधात टीका झाल्यावर जावडेकर धावून येतात. प्रवक्ता असल्याचा फायदा राज्यसभेत दिसून येतो.


३. सुभाष भामरे : संरक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ. सुभाष भामरे यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सर्जिकल स्ट्राईक, चंदू चव्हाणाला पाकिस्तानाच्या तावडीतून परत आणण्याच्या कामगिरीचे श्रेय डॉ सुभाष भामरे यांच्याकडे जाते. पूर्णवेळ संरक्षण मंत्री नसतानाही समर्थपणे संरक्षण मंत्रालय सांभाळल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुड बुकमध्ये भामरे यांची नोंद झाली आहे. 


४. हंसराज अहिर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे नक्षल, केंद्र शासित प्रदेश, कारागृह आणि निमलष्करी दलाची जबाबदारी आहे. बिहार आणि ईशान्यकडील राज्यातील महापूर, कश्मीर मधील तणावग्रस्त परिस्थिती, अमरनाथ हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्था आणि नक्षलवादासह दहशतवादाला आळा घालण्याचे काम समर्थपणे पेललेय. त्यामुळे मंत्रीमंडळात हंसराज अहिर यांचे स्थान पक्के आहे.


५. पियुष गोयल : पियुल गोयल हे महाराष्ट्रातून केंद्रात गेलेले खासदार आहेत. गोयल यांनी ऊर्जा क्षेत्रात चांगले काम केले आहे. सौरऊर्जाचा वापरावर भर दिला आहे. तसेच वीज पुरवठा वाढविण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळे गोयल यांना बढती मिळू शकते. 


६. सुरेश प्रभू : सुरेश प्रभू यांनी रेल्वे मध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. रेल्वे संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान कमी पडत होते. त्या सुविधा वाढविण्यावर भर दिला. सोशल मीडियातून थेट प्रवाशांपर्यंत पोहोचले. बुलेट ट्रेन, रेल्वे स्वच्छता, अपघातग्रस्तांना मदत, रखडलेले प्रकल्प वेगात पूर्ण करण्याचे लक्ष प्रभू यांनी पूर्णत्वाकडे नेले. रेल्वे कर्मचारी आणि व्यवस्थेत शिस्त आणली. अपघातामुळे राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असली तरी प्रभू यांच्या कार्यक्षमतेबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे प्रभू यांच्याकडे रेल्वे असेल. अन्यथा रेल्वे काढले तरी चांगले खाते मिळेल. प्रभू यांच्यासारखा मंत्री पंतप्रधान मोदी गमावणार नाहीत.


राजीव प्रताप रूडी, कलराज मिश्र, संजीव बलियान, निर्मला सीतारमन, बंडारू दत्तात्रय यांसह काही यूपी, बिहार आणि दक्षिणेकडील मंत्र्यानी राजीनामा दिला आहे. यावरून त्यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याचे दिसून येते. अशावेळी एकाही मराठी मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला नसल्यामुळे मराठी मंत्र्यांच्या कामगिरीवर मोदी खूष असल्याचे दिसते. त्यामुळेच मोदींचा मराठी   मंत्र्यावरील विश्वास वाढला आहे. २०१९ ची निवडणूकीत मोदींना आणि भाजपला 'अच्छे दिन' दाखविण्यासाठी याच मराठी मंत्र्यांच्या टीमची साथ मिळेल.