मुंबई : फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी हेट स्पीचवरून संवाद साधला. मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना फेसबूकच्या हेट स्पीच पॉलिसीविषयी समजवून सांगताना भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या भाषणाचा दाखला दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाईट इंडिया डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार मार्क झुकरबर्ग यांनी दिल्ली हिंसाचारादरम्यानच्या धमक्यांवरुन कपिल मिश्रा यांच्यावर टीका केली. झुकरबर्ग त्यांच्या कर्मचाऱ्यांना फेसबूकची हेट स्पीच पॉलिसी समजवत होते, यावेळी त्यांनी या भाषणाचा उल्लेख केला. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. कपिल मिश्रा यांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनाबाबत केलेल्या भाषणाचा उल्लेख झुकरबर्ग यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्यांना समजवताना केला. 


फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हेट स्पीच पॉलिसीबाबत आपल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. सगळ्यात आधी झुकरबर्ग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी अमेरिकेत सुरु असलेल्या #BlackLivesMatter आंदोलनाबाबत केलं होतं. यानंतर झुकरबर्ग यांनी कपिल मिश्रा यांच्या भाषणाचं उदाहरण दिलं. 


झुकरबर्ग यांनी कपिल मिश्रा यांचं नाव घेतलं नसलं, तरी ते भाषण हेट स्पीच असल्याचं सांगितलं. दिल्लीमध्ये सीएए आंदोलनकर्त्यांबद्दल केलेलं हे भाषण हिंसा आणि दंगल भडकवण्यासारखं आहे, असं झुकरबर्ग म्हणाले.


'जर कोणी हिंसा वाढवणारी भाषा वापरत असेल, तर आपण याला पुढे नेऊ शकत नाही. आपल्याकडे आधीही अशी काही उदाहरणं आली आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आपण हटवल्या आहेत. भारतामध्येही अशा घटना घडल्या आहेत. जर पोलिसांनी लक्ष दिलं नाही, तर आमचे समर्थक गल्ल्या खाली करतील, असं बोललं गेलं. हे एकप्रकारे समर्थकांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. आपण हे भाषण फेसबूकवरून हटवलं,' असं झुकरबर्ग म्हणाले. 


याआधी फेसबूकचे काही कर्मचारी मार्क झुकरबर्गच्या विरोधात उभे राहिले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट न हटवल्यामुळे कर्मचारी नाराज झाले होते. झुकरबर्ग यांनी ही पोस्ट फेसबूकवरून हटवण्याला मनाई केली होती. यानंतर मात्र ट्रम्प यांची पोस्ट अपमानजनक असल्याचं झुकरबर्ग म्हणाले होते. 


अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी केलेली ट्विटही वादात सापडली आहेत. ट्विटरनेही ट्रम्प यांची ही ट्विट हिंसेला चालना देणारी असल्याचं सांगत त्यांना फ्लॅग केलं होतं. जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर  'when looting starts shooting starts.' असं ट्विट ट्रम्प यांनी केलं होतं.