शहीद जवानांचे पार्थिव स्वगृही, कुटुंबियांचे चित्रण न दाखवण्याचे आवाहन
नितीन राठोड यांच्या पार्थिवावर लोणारच्या चोरपांगरा गावात तर संजय राजपूत यांच्या पार्थिवावर मलकापूर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचे पार्थिव दिल्लीतून महाराष्ट्रात आणण्यात येईल. शहीद जवान संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव दिल्लीवरून औरंगाबाद इथं आणण्यात आले आहे.. दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव सकाळी विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर पोहोचले . एक पार्थिव हेलिकॉप्टरद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे आणण्यात आले. नितीन राठोड यांच्या पार्थिवावर लोणारच्या चोरपांगरा गावात तर संजय राजपूत यांच्या पार्थिवावर मलकापूर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लाईव्ह अपडेट
शहीदांच्या कुटुंबियांचे चित्रण न दाखवण्याचे आवाहन
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे चित्रण दाखवण्याचे आवाहन सुरक्षा विभागाने माध्यमांना केले आहे. यासंदर्भातील एक पत्रक जारी करण्यात आले आहे. आक्रोश आणि वेदनादायक चित्रण दाखवण्यावर माध्यमांना प्रतिबंध लावण्यात आले आहेत. कारण देशात अराजकता माजावी हेच दहशतवाद्यांना हवे आहे. असे चित्रण दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढवतात. तसेच अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय शहीद जवानांची नावे फ्लॅश करु नका असेही आवाहन करण्यात आले आहे. सीआरपीएफने या पत्रकाचे पालन करण्याचे आवाहन माध्यमांना केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून सर्व मोठ्या राजकीय पक्षांना याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार सर्व पक्षांना देणार असल्याचे गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देश या मुद्द्यावरुन एकसंघ राहावा यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर तात्काळ कॉंग्रेसची पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये आम्ही या प्रकरणी सरकारच्या सोबत आहोत असे त्यांनी म्हटले होते. शिवसेना खासदार अरविंद केजरीवाल यांनी देखील आपण बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे.