नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मारुती सुझुकी इंडियाला (Maruti Suzuki India) 17 वर्षात पहिल्यांदा एखाद्या तिमाहीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे कंपनीच्या विक्रीत अतिशय कमी आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या, पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे एप्रिल ते जूनदरम्यान कंपनीला 268.3 कोटी रुपयांचा कंसोलिडेटेड लॉस झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maruti suzukiनुसार, गेल्या वर्षी 2019-20 मध्ये याच तिमाहीमध्ये कंपनीला 1,376.8 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचं जुलै 2013 मध्ये शेअर बाजारात लिस्टिंग झालं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच तिमाहीमध्ये मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून 2020 या तिमाहीमध्ये एकूण विक्री 3,677.5 कोटी होती. जी एक वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये 18,735.2 कोटी रुपये इतकी होती. 


यावर्षी पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने एकूण 76,599 वाहनांची विक्री केली. त्यापैकी 67,027 वाहनांची घरगुती बाजारात विक्री करण्यात आली. तर 9572 कार निर्यात करण्यात आल्या. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने एकूण 4,02,594 वाहनांची विक्री केली होती.


कोरोनामुळे, कंपनीच्या इतिहासातील सर्वात वाईट तिमाही असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत असल्याने, कंपनीच्या कारखान्यांमध्ये कोणतंही उत्पादन करण्यात आलेलं नाही. कंपनीने सांगितलं आहे. मे महिन्यात उत्पादन-विक्रीचं काम सुरु करण्यात आलं, परंतु उत्पादनातील नियमित कामकाज केवळ 2 आठवड्यांमध्ये होऊ शकणाऱ्या कामाइतकं झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे. कर्मचारी, ग्राहक आणि डिलरशीप लोकांचं आरोग्य सुरक्षित राखणं ही कंपनीची पहिली प्राथमिकता असल्याचं, कंपनीने सांगितलं आहे.