नवी दिल्ली : राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मायावतींवर निशाणा साधता मोदी म्हणालेत, या प्रकरणी त्या मगरीचे अश्रू ढाळत आहेत. मायावती याबाबत गंभीर असल्यास त्यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे आव्हान मोदी यांनी दिले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावरून राजकारण करू नये. आधी देशातल्या दलितांवरील अत्याचारांबाबत जबाबदारी घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया मायावती यांनी दिली.  बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज एका जाहीर पत्रकार परिषदेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. राजस्थानमध्ये निवडणूक संपेपर्यंत याप्रकरणात पोलिसांनी कारवाई केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.