मुंबई : तुम्हाला डॉक्टर बनायचंय पण इंग्रजी मध्ये अडचण आणतेय! तर आता घाबरू नका...कारण इंग्रजी यापुढे तुमच्या डॉक्टर होण्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. तुम्ही आता मध्य प्रदेशात हिंदीमध्ये एमबीबीबीएसचा अभ्यास करू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास आता तुम्ही हिंदीतून करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमात शिकवण्याची तयारी सुरू आहे. भोपाळच्या शासकीय गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून राज्यात याची सुरुवात केली जाणार आहे. हिंदी माध्यमातून एमबीबीएसचे शिक्षण देणारं मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे.


MBBS चा अभ्यासक्रम हिंदीत करण्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि त्याचा अहवाल देण्यासाठी मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. जितेन शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती सारंग यांनी दिली. 


सारंग म्हणाले की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रजासत्ताक दिनी राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात राज्यातील एमबीबीएससह सर्व वैद्यकीय शिक्षण हिंदी माध्यमात देण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने वैद्यकीय शिक्षण विभागाने काम सुरू केलंय.


मुख्यमंत्री चौहान यांच्या विचारानुसार, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम हिंदी माध्यमात शिकवण्यासाठी पावलं उचलली जातायत. भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधून हे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं, सारंग यांनी सांगितले. 


यामुळे आता पुढील सत्रापासून हिंदी माध्यमात एमबीबीएस अभ्यासक्रमाचं शिक्षण सुरू केलं जाण्याची शक्यता आहे. तर आता महाराष्ट्रात असा निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षण मराठीतून मिळणार का अशा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.