नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. परराष्ट्र मंत्रालयानं तत्काळ यावर स्पष्टीकरण देत, पंतप्रधान मोदींनी काश्मीर मुद्यावर कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नसल्याचं सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य ऐकलंय. यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्ताननं विनंती केली तर काश्मीर मुद्यावर मध्यस्थ बनण्याची तयारी दर्शवलीय' असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलंय. सोबतच, 'पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्यांवर केवळ द्विपक्षीय चर्चा व्हावी, या आपल्या भूमिकेवर भारत ठाम आहे' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करत ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. 


पाकिस्ताननं सर्वात अगोदर सीमेपलिकडे दहशतवाद थांबवावा. शिमला करार आणि लाहोर घोषणापत्रातील तरतुदींनुसारच या प्रश्नावर तोडगा निघेल, असंही रवीश कुमार यांनी पाकिस्तानला सुनावलंय. 


यापूर्वी वृत्तसंस्था 'एएफपी'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थ बनण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून दोन्ही नेत्यांना काश्मीर प्रश्नाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी ट्रम्प यांनी हे विधान केले होते. उल्लेखनीय म्हणजे, यानंतर व्हाईट हाऊसकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ट्रम्प यांचे हे विधान वगळण्यात आले आहे.