भोपाळ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या १० दिवसापासून मेधाताई मध्यप्रदेशात चिखलदा गावात उपोषणाला बसल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये सरदार सरोवर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातल्या चिखलदा, बडवानी, धार, अलिराजपूर या गावामध्ये पाण्याची पातळी वाढते आहे. या भागातल्या १९१ गावातल्या 40 हजार नागरिकांना यामुळे स्थलांतरीत व्हावं लागण्याची भीती नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पण केंद्र सरकारच्या मते हा आकडा १८ हजारच्या आसपास आहे. त्यामुळे या नागरिकाचं योग्य पुनर्वसन व्हावं यासाठी मेधा पाटकर उपोषण करत आहेत.


केंद्रीय मंत्री उमा भारतींनी मेधाताईंशी संपर्क करून उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली. दरम्यान सरदार सरोवर धरणाचे दरवाजे बंद झाल्यानं नदीपातळीत झपाट्यानं वाढ होते आहे. 123 मीटर ही धोक्याची पातळी आहे. काल संध्याकाळी ही पातळी 121.90 मीटरपर्यंत पोहचली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं आहे.