संतापजनक! प्रियकराला दगडाने मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार
मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत
मैसूर : कर्नाटकातील म्हैसूर इथं एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरा बाहेर असलेल्या ललिताद्रिपुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी मंगळवारी चामुंडा हिल्सच्या दिशेनं तिच्या प्रियकरासोबत दुचाकीने जात होती, त्यामुळे अचानक काही जणांनी त्यांना घेरलं आणि मारहाण केली.
पैसे दिले नाहीत म्हणून बलात्कार
म्हैसूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण जेव्हा त्यांना पैसे मिळाले नाहीत, तेव्हा पीडितेच्या मित्रावर हल्ला केला आणि मुलीला ओढून निर्जन स्थळी नेलं. यानंतर दोन जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले तर प्रियकरावर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केलं.
पीडित मुलगी उत्तर प्रदेशातून म्हैसूरला अभ्यासासाठी आली होती. ती एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगितलं जात आहे. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिचा मित्र रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हैसूरचे पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या पथकं स्थापन केली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आरोपींना पकडण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देशही मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले आहेत. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र यांनी ही घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच गुरुवारी ते मैसूरला जाणार आहेत.