नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अटळ झाली आहे. यूपीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात डाव्या पक्षांसह यूपीएच्या १७ घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर एकमत झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्य़ा नावाची घोषणा केल्यानंतर अनेक पक्षांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष होतं. काँग्रेसने आज बैठक घेत त्यांचा वेगळा उमेदवार घोषित केला आहे. युपीएकडून मीरा कुमार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद विरुद्ध मीरा कुमार अशी लढत पाहायला मिळणार आहे.


एनडीएच्या दलित उमेदवाराला आव्हान देण्यासाठी युपीएनंही दलित उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्याआधी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा झाली. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूनं एनडीएच्या कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं युपीएचं पारडं थोडं हलकं झालं आहे.