मेघालयचे मुख्यमंत्री कोरोनाच्या विळख्यात
मेघालयमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ५८६ वर पोहोचली आहे.
मेघालय : देशावर असलेलं कोरोनाचं सावट कधी दूर होईल याची प्रतिक्षा सर्वच नागरिक करत आहेत. कोरोना विषाणूची लागण ही फक्त सर्वसामान्य जनतेला होत नसून राजकारणी, कलाकार, खेळाडूंना देखील होत आहे. दरम्यान मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोनराड संगमा यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केलं आहे.
ट्विट करत ते म्हणाले, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरी आयसोलेशनमध्ये आहे. शिवाय मला सैम्य लक्षणं देखील जाणवत आहेत. त्यामुळे गेल्या ५ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी. ' असं आवाहन त्यांनी केलं.
त्याचप्रमाणे त्यापैकी कोणी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि घरात सुरक्षित राहवं असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. सध्या मेघालयमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ५८६ वर पोहोचली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५८० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.