Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023: ईशान्य भारतामधील मेघालय (Meghalaya Election Results), त्रिपुरा (Tripura Election Results) आणि नागालँडमधील (Nagaland Election Results) विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या, गुरुवारी (2 मार्च) निकाल होणार आहे. या निकालाच्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स तुम्हाला 'झी 24 तास'वर पाहता येणार आहेत. मागील आठवड्यामध्ये या राज्यांमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर एक्झिट पोलमधून मांडण्यात आलेल्या अंदाजांनुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं देखील एक्झिट पोलचे अंदाज सांगतात. असं असलं तरी नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलची आकडेवारी उद्याच स्पष्ट होणार आहे. भाजपासाठी ही तिन्ही राज्य त्यांच्या ईशान्य भारतासंदर्भातील धोरणानुसार फार महत्त्वाची असून या निवडणुकींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या राज्यांमध्ये मोदींची जादू चालणार की स्थानिक पक्ष आणि काँग्रेस यश मिळवणार हे 2 मार्चच्या निकालामध्ये स्पष्ट होईल.


मेघालयमध्ये पुन्हा सत्ताधाऱ्यांचं सरकार? (Meghalaya Assembly Election Result 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला सर्वाधिक मतं मिळण्याचा अंदाज एक्झीट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण 60 जागांपैकी 18 ते 24 जागांवर नॅशनल पीपल्स पार्टीला यश मिळू शकतं. तिन्ही राज्यांपैकी मेघालयमध्येच भाजपाला फारसं यश मिळणार नाही असा अंदाज आहे. या राज्यामध्ये भाजपला फक्त 4 ते 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपाच्या तुलनेत काँग्रेस या ईशान्येकडील राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत जास्त म्हणजेच 6 ते 12 जागांवर विजयी होईल असं एक्झिट पोल दर्शवतात. या शिवाय पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसला 9 तर, इतर पक्षांना 17 ते 29 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरल्यास सध्या सत्तेत असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचं सरकारच सत्तेत येईल.


नागालँडमध्ये भाजपा सरकार (Nagaland Assembly Election Result 2023)


भाजपा ज्या दोन राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागालँड आघाडीवर आहे. येथील 38 ते 48 जागा भाजपा आणि एनडीपीपीच्या युतीला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एनरीएफला केवळ 3 ते 8 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. एलजेपी, एनसीपी, आरपीआय (ए) सहीत अन्य पक्षांचा एकूण आकडा 15 पर्यंत राहील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.


त्रिपुरामध्येही भाजपाच (Tripura Assembly Election Result 2023)


एक्झिट पोलनुसार,  त्रिपुरामध्येही भाजपाचं कमळ फुलण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात सत्तेत असलेला हा पक्ष त्रिपुरामध्ये प्रचंड मतांनी विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 36 ते 45 जागा मिळतील असा अंदाज आहे. येथील तब्बल 45 टक्के मतं भाजपाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टिपरा मोथराला 9 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, डावे पक्ष- काँग्रेस आणि टिपरा मोथरा यांच्या वाट्याला अनुक्रमे 32 ते 20 टक्के मतं मिळतील अशी शक्यता आहे.


सोशल मीडियावरही अपडेट्स...


 'झी 24 तास' च्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन तुम्हाला या तिन्ही राज्यांमधील निवडणुकांचे क्षणोक्षणीचे अपडेट्स पाहता येतील. फेसबुकवर अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर ट्विटरवरील अपडेट्स तुम्हाला @zee24taasnews या अकाऊंटवर पाहता येतील. त्याचप्रमाणे युट्यूबवरही तुम्हाला या निकालाचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहता येईल.