मेहबुबा मुफ्तींच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव
मेहबुबा मुफ्ती सईद यांच्या मुलीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यापैकी ओमर अब्दुल्ला सध्या हरी निवास पॅलेस तर मेहबुबा मुफ्ती श्रीनगरच्या चश्मे शाही येथे स्थानबद्ध आहेत. दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद यांच्या मुलीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आईची भेट घेता यावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी केली आहे.
मेहबुबा यांच्या तब्येतीची काळजी वाटत असल्याने त्यांच्या भेटीची परवानगी मिळावी अशी मागणी इलतिजा यांनी केलीय. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठींवर निर्बंध आहेत. आज इलतिजा यांच्या याचिकेवर सुनावणी आहे.
दोन्ही नेत्यांशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तपासयंत्रणांचे काही अधिकारी या दोन्ही नेत्यांशी चर्चा करत आहेत. काश्मीर खोऱ्यातील राजकीय कोंडी कायम राहू देणे शक्य नाही. त्यामुळे सरकार ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या दोघांवरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. जेणेकरून काश्मीरमध्ये चर्चेसाठी अवकाश निर्माण होईल, अशी माहिती या सूत्रांनी दिली.