वॉशिंग्टन: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपची 'मोदी है तो मुमकिन है' ही घोषणा चांगलीच लोकप्रिय झाली होती. प्रचाराच्या काळात ही घोषणा सातत्याने लोकांच्या कानावर पडत होती. निवडणुकीत भाजपला त्याचा चांगलाच फायदाही झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनासुद्धा या घोषणेची भुरळ पडली. माईक पॉम्पेओ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी वॉशिंग्टन येथे केलेल्या भाषणात माईक पॉम्पेओ यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाचा दाखला देताना 'मोदी है तो मुमकिन है' ही घोषणा दिली. ते इंडिया आइडियाज समिट कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मला भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या पातळीवर नेऊन ठेवायचे आहेत. मोदी आणि ट्रम्प प्रशासनासाठी ही एक अद्वितीय संधी आहे, असेही पॉम्पेओ यांनी सांगितले. 


आगामी काही दिवसांमध्ये माईक पॉम्पेओ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण अशा सामरिक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 



राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य नव्या पातळीवर जाऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैश्विक स्तरावर आपल्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करता येईल. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे पॉम्पेओ यांनी म्हटले. तसेच येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


माईक पॉम्पेओ भारताबरोबरच श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरिया या इंडो-पॅसिफिक पट्ट्यातील देशांनाही भेट देणार आहेत.