एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जाहीर आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वायनाड मतदारसंघाऐवजी हैदराबादमधील मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान असदुद्दीन औवेसी यांनी दिलं आहे. हैदरबादमधील आपल्या मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेसची सत्ता असतानाच उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असंही यावेळी ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) आव्हान देतोय की, त्यांनी वायनाड नव्हे तर हैदराबादमधून निवडणूक लढवावी. तुम्ही नेहमी मोठी विधान करत असतात. पण मैदानात उतरुन माझ्याविरोधात लढा. काँग्रेसमधील लोक भरपूर काही गोष्टी बोलतील. पण मी तयार आहे. बाबरी मशीद आणि सचिवालयाची मशीद काँग्रेसच्याच कार्यकाळात उद्ध्वस्त करण्यात आली," असं असदुद्दीन औवेसी म्हणाले आहेत.


तेलंगणामध्ये काँग्रेस आणि एएमआयएममध्ये सतत संघर्ष सुरु आहे. कारण वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आगामी राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. याआधी राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत बोलताना तेलंगणात भारतीय जनता पक्ष, भारत राष्ट्र समिती आणि एएमआयएम एकजुटीने काम करत आहेत. आपण या आघाडीविरोधात लढत आहोत असं विधान केलं होतं. 


"काँग्रेस पक्ष तेलंगणात भारत राष्ट्र समितीविरोधात लढा देत नाही. हा लढा भारत राष्ट्र समिती, भाजपा आणि एमआयएम या तिघांविरोधात आहे. ते सर्वजण आपण वेगवेगळे पक्ष असल्याचा दावा करत आहेत. पण ते सर्वजण एकत्र काम करत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.


वायनाडचे खासदार असणाऱ्या राहुल गांधींनी असाही दावा केला होता की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव किंवा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर कोणतेही सीबीआय-ईडी खटले नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना "स्वतःचे लोक" मानतात.


तेलंगणा विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या हेतूने सध्या सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी बीआरएसने तर आधीच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सहा आश्वासनं दिलं आहेत. आपण सत्तेत आल्यास ही आश्वासनं पूर्ण कऱण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.