मिर्झापूर : शाळेतील खोडकर, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकवेळा, शिक्षकांकडून शिक्षा दिली जाते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतला तो एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्या शिक्षेमुळे मुलांना गंभीर इजा होईल, अशा पद्धतीने मारहाण करणं चुकीचं आहे. असाच एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर जिल्ह्यातील अहरौरा इथल्या एका खासगी शाळेतील शिक्षकाने शिक्षा देण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या छोट्याशा खोडसाळपणावर शाळेचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या मुलाला शिक्षा म्हणून थेट शाळेच्या बाल्कनीतून उलटं लटकवलं. यादरम्यान कोणीतरी फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला, जो नंतर व्हायरल झाला आहे.


शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुलाचे नाव सोनू यादव असून त्याचं वय अवघं 7 वर्षे आहे. त्याची चूक एवढीच होती की तो शाळेच्या मधल्या सुट्टीत बाहेर पाणीपुरी खायला गेला होता. शाळेचे मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा यांना या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या मुलाला तालिबानी शिक्षाच दिली.


या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोनूचे वडील रणजीत यादव यांनी सांगितले की, शाळेतून आल्यानंतर सोनू कोणाशी काही न बोलात फक्त रडत होता. त्याला विचारल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. या शिक्षेनंतर सोनू गप्प आहे आणि तो खूप घाबरलाही आहे.


हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर मनोज विश्वकर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण हे जाणूनबुजून केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. चुकून मुलाला बाल्कनीत लटकवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी मुलाच्या पालकांची माफीही मागितली आहे. पण ही बाब गंभीर असून वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता पुढील यदेशीर कारवाई केली जाईल.