इंदिरा गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील गार्डच्या हाती मिझोरमची सूत्रं! होणार मुख्यमंत्री
Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत येणार आहे.
Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये जोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) या पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 40 पैकी 27 जागा जिंकल्या आहेत. झेडपीएमचा हा विजय मिझो नॅशनल फ्रंटसाठी (एमएनएफ) मोठा धक्का मानला जात आहे. झेडपीएमच्या या विजयामुळे एमएनएफ सत्तेतून बाहेर फेकला गेला आहे. एमएनएफला केवळ 10 जागांवर विजय मिळवता आहे. भारतीय जनता पार्टीला 2 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या झेडपीएमच्या प्रमुख नेत्यांची नावं आता मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून लालदुहोमा यांचेही नाव चर्चेत आहे. लालदुहोमा यांनी सेरछिप मतदारसंघामध्ये एमएनएफचे उमेदवार जे. माल्सावमजुआला वानचावंग यांना 2,982 मतांनी पराभूत केलं. मुख्यमंत्री जोरमथंगा आइजोल यांनी ईस्ट-फर्स्टच्या मतदारसंघामध्ये झेडपीएमचे उमेदवार लालाथनसांगाना यांना 2,101 मतांनी पराभूत केलं.
काँग्रेस आणि एमएनएफ वगळून पहिल्यांदाच बनणार सरकार
मिझोरममध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमएनएफने 26 जागांवर विजय मिळवला होता. मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत येणार आहे. आता झेडपीएमचे नेता लालदुहोमा यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. मिझोरममध्ये एवढा मोठा उलटफेर करणारे लालदुहोमा नेमके आहेत कोण याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. लालदुहोमा यांचा राजकीय प्रवास कसा राहिला, ते नेमके कोण आहेत यावर नजर टाकूयात...
पहिलेच खासदार जे अपात्र ठरले कारण...
लालदुहोमा यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे ते 1977 च्या बॅचचे आयपीएल अधिकारी आहेत. लालदुहोमा हे 74 वर्षांचे आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांच्या नावांमध्ये सर्वाधिक चर्चेचं नाव होण्याआधीच लालदुहोमा हे मिझोरममध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. लालदुहोमा यांचं नाव देशपातळीवर पहिल्यांदाच चर्चेत आलं ते एका नकारात्मक बातमीमुळे. पक्षबदल केल्याप्रकरणी पक्षबदल विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले ते देशातील पहिले खासदार आणि त्यानंतर पहिले आमदार ठरले. मात्र त्यांनी सोमवारी मिझोरममध्ये इतिहास घडवला. लालदुहोमा यांनी विद्यमान मुख्यमंत्री जोरमथांगा यांना पायउतार होण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे नकोश्या कारणाने चर्चेत आलेले लालदुहोमा आता मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलं यश
म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चंफाई जिल्ह्यातील तुआलपुई गावामध्ये जन्मलेल्या लालदुहोमा यांनी घेतलेलं शिक्षणच त्यांना गरीबीमधून मुक्त करण्याचं प्रमुख साधन ठरलं. त्यांनी शिक्षणामध्ये दाखवलेली चुणूक पाहून पूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेल्या या राज्याचे मुख्यमंत्री सी. चुंगा प्रभावित झाले. त्यांनी 1972 साली आपल्या कार्यकाळात लालदुहोमा यांना मुख्य सहाय्यक म्हणून नियुक्त केलं. लालदुहोमा यांनी नोकरी करतानाच गुवहाटी विद्यापीठात रात्रशाळेच्या माध्यमातून एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पदवीधर झाल्यानंतर 5 वर्षांनी लालदुहोमा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. गोव्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली तेव्हा लालदुहोमा हे ड्रग्ज माफियांविरोधातील कारवायांसाठी ओळखले जायचे.
इंदिरा गांधींचे बॉडीगार्ड
लालदुहोमा यांनी गोव्यातील नियुक्तीदरम्यान एवढी चमकदार कामगिरी केली की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची 1982 साली नवी दिल्लीमध्ये नियुक्ती केली. नंतर लालदुहोमा हे इंदिरा गांधींच्या सुरक्षा यंत्रणेचा भाग झाले. लालदुहोमा यांनी इंदिरा गांधींच्या आग्रहास्तव विद्रोही नेते लालडेंगा यांना मिझो नॅशनल फ्रंटबरोबर चर्चा करण्यासाठी राजी केलं. 1984 साली लालदुहोमा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. ते काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र चार वर्षानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली.