काँग्रेस-जेडीएस आमदार आमच्या संपर्कात, येडियुरप्पांची हूल?
याच दरम्यान, काँग्रेसचे ७७ आमदार हैदराबादहून बंगळुरूसाठी रवाना झालेत.
बंगळुरू : कर्नाटकाच्या सत्ता नाटकात मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायचंय... त्यामुळेच आता त्यांच्यासहीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झोप उडलीय... त्याहून जास्त काँग्रेस आणि जेडीएसचे वरिष्ठ नेत्यांना काळजी लागलीय... आपले आमदार फुटणार तर नाहीत ना? याची धास्ती त्यांना लागलीय. याच दरम्यान, काँग्रेसचे ७७ आमदार हैदराबादहून बंगळुरूसाठी रवाना झालेत.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्याला बहुमताहून अधिक मतं मिळतील असा दावा केलाय. काँग्रेस - जेडीएसचे आमदार संपर्कात आहेत का? असा प्रश्न केल्यावर येडियुरप्पांनी म्हटलं, निश्चितच ते आमच्या संपर्कात आहेत... त्यांच्या समर्थनाशिवाय आम्ही बहुमत कसं सिद्ध करू शकू?... फ्लोअर टेस्टमध्ये आम्हाला १०१ टक्के यश मिळणार... असा दावाही यावेळी येडियुरप्पांनी केलाय. याच पद्धतीचा दावा कर्नाटकात पर्यवेक्षकाची भूमिका निभावणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केलाय, हे विशेष...
वादग्रस्त क्लीप चर्चेत?
दरम्यान, बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला घोडेबाजार चांगलाच तेजीत आलाय. सत्ता स्थापनेसाठी आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. याचसंदर्भात काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी मंत्री आणि खाण माफिया जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध केलीय. रायचूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बसनगौडा दड्डल यांना गळाला लावण्यासाठी जनार्दन रेड्डींनी फोनवरून संपर्क साधल्याचा आणि आमदारांना आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
बोपय्यांच्या निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
कर्नाटकातील रणसंग्रामात काँग्रेस - भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं कर्नाटकात बी एस येडियुरप्पा यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. अशा वेळी नव्या विधानसभा संचालनासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार के जी बोपय्या यांची निवड केलीय. राज्यपालांनी घाईघाईतच त्यांचा शपथग्रहण सोहळाही उरकून घेतलाय. परंतु, काँग्रेसला मात्र हा निर्णय रुचलेला नाही. काँग्रेसनं या प्रकरणात पुन्हा एका सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकात भाजप आमदार के जी बोपय्या यांच्या नावाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचं घेणार आहे. यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. बोपय्या गेल्या वेळी भाजप सरकारमध्ये कर्नाटक विधानसभा अध्यक्ष होते. सध्या ते विराजपेठ मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत. परंतु, के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय.