नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर आता सोमवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार सुरु झाला आणि आता शिक्षा सुनावल्यानंतर आणखीन हिंसा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढता हिंसाचार रोखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तणाव आणखीन वाढणार असल्याच्या शक्यतेने हरियाणा आणि पंजाब सरकारने मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी घातली आहे. ही बंदी मंगळवार म्हणजेच २९ ऑगस्टपर्यंत राहणार आहे.


यापूर्वी राम रहीम याला न्यायालयाने दोषी ठरविल्यावर गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. राम रहीम याच्या शिक्षेसंदर्भात विशेष न्यायालय सोमवारी आपला निर्णय देणार आहे. यासाठी रोहतक कारागृह परिसरात एक विशेष न्यायालय बनविण्यात येणार आहे. राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत.


हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (एसीएस) गृह, राम निवास यांनी सांगितले की, हरियाणा सरकारने वॉईस कॉलिंग वगळता इतर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २जी, ३जी, ४जी, जीपीआरएस, एसएमएस, डोंगल सेवेचा समावेश आहे.


बाईल इंटरनेट सेवा २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. एखाद्या व्यक्तीने या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.


सैन्य दलाच्या तुकड्या तैनात 


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि पंजाबमध्ये सैन्य दलाच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच पंचकूला, रोहतक, कैथल, अंबालामधील सर्व शाळा आणि कॉलेजेस सोमवारी बंद राहणार आहेत.