एका स्कूटरवर फिरणाऱ्या मोदी - तोगडियांत का आलं वितुष्ट? जाणून घ्या...
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपला आवाज दाबण्याचा दाबण्याचा तसंच जुने खटले काढून आपल्याला गोवलं जात असल्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
मुंबई : आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपला आवाज दाबण्याचा दाबण्याचा तसंच जुने खटले काढून आपल्याला गोवलं जात असल्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
तोगडियांचा निशाणा कुणावर?
साहजिकच त्यांचा हा आरोप कुणाविरुद्ध आहे? या प्रश्नावर त्यांनी वेळ आल्यावर पुराव्यांसहीत उत्तर देणार, असं उत्तर दिलं. त्यानंतर आता यामागे मोदी सरकारचा हात असल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. भाजप सरकारला सतत विरोध करण्याचा हा परिणाम तोगडियांना भोगावा लागतोय का? असाही कयास लावला जातोय.
...तोगडिया झाले गायब!
राजस्थानच्या गंगापूर कोर्टानं दंगा भडकावल्या प्रकरणी विहिंपच्या प्रवीण तोगडियांविरुद्ध समन्स जारी केले होते. अनेक वेळा वॉरंट मिळाल्यानंतरही तोगडिया कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर अजामीपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. त्यानंतर राजस्थान पोलीस सोमवारी अहमदाबादच्या सोला पोलिसांसोबत त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले परंतु, त्याआधाची तोगडिया तिथून सटकले होते.
वॉरंटचा सिलसिला...
गेल्या काही दिवसांपासून तोगडियांविरुद्ध अचानाक वॉरंट जारी होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसलं. १९९८ च्या एका प्रकरणात कोर्टानं त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं... जिथं तोगडिया उपस्थित राहिले. त्यानंतर गंगापूर कोर्टाचंही वॉरंट आलं... लवकरच हरियाणाच्या कोर्टाकडूनही त्यांना वॉरंट मिळू शकतं. याचाच अर्थ जुनी प्रकरणांत तोगडिया अडकण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वाद तोगडियांना भारी पडताना दिसतोय, असं काहींचं म्हणणं आहे.
मोदींचा तोगडियांना इशारा
मोदी विरुद्ध तोगडिया अशी सुरुवात झाली गुजरात सरकारमध्ये... मोदी २००२ मध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी गृहविभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यावरून तोगडियांना इशारा दिला. तोगडियांना ही गोष्ट खटकली होती... आणि तिथूनच एका स्कूटरवर फिरणाऱ्या मोदी-तोगडिया वादाला सुरुवात झाली.
इतर काही वादाचे मुद्दे...
- २०११ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी सद्भावना कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तोगडियांनी खिल्ली उडवली... 'आपली इमेज राखण्यासाठी मोदी हिंदुत्वाचा अजेंडा दूर सारत आहेत' असा आरोप तोगडियांनी केला होता.
- मोहम्मद अली जीना यांच्यावर आडवाणींनी केलेल्या टिप्पणीवर विरोध दर्शवताना विहिंपचे कार्यकर्ते गुजरातमध्ये निदर्शनं करत होते तेव्हा पोलिसांनी लाठिचार्ज केला होता. यावर विहिंप आणि गुजरात सरकारमध्ये वाद वाढला होता.
- विहिंपच्या कार्यकारी प्रमुख पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या एका गटात तोगडियांना इथून हटवण्याचे प्रयत्न सुरू असताना शक्ती प्रदर्शन करत विहिंपच्या ७० टक्के लोकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं तोगडियांनी भुवनेश्वरच्या बैठकीत सांगितलं. त्यानंतर आरएसएसनं त्यांना तीन वर्षांसाठी कार्यकारी प्रमुख बनवलं.
- तोगडियांनी यापूर्वी राम मंदिर, समान आचार संहिता, कलम ३७०, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्यांवर आपलं मतं मांडलीत. अनेक मुद्यांवर त्यांनी मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.