`माझी काशी खूपच बदलली आहे, एकदा..`, पीएम मोदी यांचं यूपी इन्व्हेस्टर समिटमध्ये वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यूपी इन्व्हेस्टर समिटच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी @3.0 चं उद्घाटन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यूपी इन्व्हेस्टर समिटच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी @3.0 चं उद्घाटन केलं. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या विकासाचे कौतुक केले. राज्यातील गुंतवणूकदारांच्या परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, "यूपीच्या तरुणांमध्ये तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची क्षमता आहे. यूपीमध्ये 80 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीशी संबंधित करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या विक्रमी गुंतवणुकीमुळे यूपीमध्ये हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे भारतासह उत्तर प्रदेशची वाढती विकासकथा दर्शवते."
'माझी काशी खूप बदलली आहे'
पीएम मोदी म्हणाले की, मी काशीचा खासदार आहे, माझी इच्छा आहे की, कधीतरी वेळ काढून माझी काशी बघून या. काशी खूप बदलली आहे. काशी प्राचीन सामर्थ्याने नव्या रुपात सजू शकते, हे उत्तर प्रदेशच्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे. नुकतीच केंद्रातील एनडीए सरकारने 8 वर्षे पूर्ण केली आहेत. वर्षानुवर्षे, आम्ही सुधारणा-प्रदर्शन-परिवर्तन या मंत्राने पुढे गेलो आहोत.
पंतप्रधान म्हणाले की, या अर्थसंकल्पात आम्ही गंगेच्या दोन्ही काठावर 5-5 किमीच्या परिघात रसायनमुक्त नैसर्गिक शेती कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे. यूपीमध्ये, गंगा नदी 1100 किमी पेक्षा जास्त लांब आहे आणि 25-30 जिल्ह्यातून जाते. या भागात नैसर्गिक शेतीसाठी चांगली संधी आहे.