पटना : केंद्र सरकारने गंगा नदीवरील महात्मा गांधी सेतुला समांतर बनवण्यात येणाऱ्या महासेतु प्रकल्पाशी संबंधित निविदा रद्द केली आहे. या प्रकल्पात चिनी कंपन्यांचा सहभाग होता. या प्रकल्पासाठी निवडलेल्या चार कंत्राटदारांपैकी दोन चिनी कंपन्या असल्याने केंद्राने निविदा रद्द केल्याचं बिहार सरकारच्या प्रमुख अधिकारी सूत्रांनी रविवारी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च 2900 कोटी रुपये आहे. यात 5.6 किमी लांबीचा मुख्य पूल, इतर छोटे पूल, अंडरपास आणि रेल्वे ओव्हरपास यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय भारत-चीन संघर्ष आणि गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर 20 भारतीय जवान शहीद होण्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. 


चीनकडून भारतीय सीमेवर झालेल्या हिंसक झडपच्या पार्श्वभूमीवर चीनी उत्पादनं आणि व्यावसायिक घटकांवर बहिष्कार घालण्याच्या देशव्यापी आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चिनी प्रकल्प व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. 16 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींच्या मंत्रिमंडळाच्या समितीने या महासेतु प्रकल्पाला मंजुरी दिली होती.


योजनेनुसार मुख्य पुलासह चार अंडर पास, एक रेल्वे ओव्हर ब्रिज, 1.58 मार्ग सेतु, उड्डाणपूल, चार छोटे पूल, पाच बस स्टॉप आणि 13 रोड जंक्शन बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेतीन वर्षांचा होता आणि जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार होता.