बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?
Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Bank Holidays: बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुट्टी असली की अनेकदा सर्वसामान्य नागरिकांच्या बँकेशी संबंधित कामांचा खोळंबा होतो. हो, पण ही सुट्टी कर्मचाऱ्यांसाठी मात्र फायद्याची ठरते. बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. कारण, सणवार असो किंवा मग एखादा विशेष दिवस, या मंडळींना भरपगारी सुट्टी लागू होते आणि इतरांना मात्र त्यांचा हेवाच वाटत राहतो. आता पुन्हा एकदा बँका आणि सुट्ट्या हा मुद्दा चर्चेत येण्यामागं कारण ठरत आहे एक प्रस्ताव.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंगळवारी एक प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती संसदेत दिली. या प्रस्तावामध्ये देशातील प्रत्येक बँकेला आठवड्याच्या प्रत्येत शनिवार आणि रविवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. थोडक्यात सदर प्रस्तावामध्ये बँकांच्या 5 Days Week ची मागणी उचलून धरण्यात आली. अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी ससंदेत हा प्रस्ताव सादर केला. ज्यामुळं आता येत्या काळात बँक कर्मचाऱ्यांना आठवड्याचा प्रत्येक शनिवार- रविवारी सुट्टी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेसुद्धा वाचा : 820 कोटींचा नवा घोटाळा! बँकेने नाही ग्राहाकांनीच अचानक आलेला पैसा उडवला; CBI चा मोठा खुलासा
2015 मध्येच भारत सरकारनं एक महत्त्वाचा नियम लागू केला होता. ज्यामध्ये महिन्यातील दोन शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून देशातील सर्व बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीसुद्धा सुट्टी देण्यात आली. यामध्ये खासगी आणि सार्वजनिक विभागातील सर्व बँकांचा समावेश होता.
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना कार्यालयीन कामांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा ही मागणी फार आधीपासून सातत्यानं केली जात आहे. तेव्हा आता या क्षेत्रात काम करणाऱ्या 1.5 मिलियन कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या बाबतीत कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार IBA कडून त्यांना शनिवारच्या सुट्टीसाठीचा प्रस्ताव मिळाला असला तरीही त्यांनी भविष्यात या प्रस्तावाव नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास बँकेतील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांसाठी काम करण्याचा नियम लागू होण्यासोबतच एक वाढीव सुट्टी मिळेल. पण, त्यांचे कामाचे तास मात्र वाढवले जाण्याचीही शक्यता आहे.