नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांमध्ये परतीचा जोरदार पाऊस सुरु असतानाच सोमवारी भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा हंगाम संपल्याची घोषणा करण्यात आली. यंदाचे पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा अधिक राहिले. तसेच देशात १९९४ नंतर उच्चांकी पाऊस पडल्याचेही यावेळी हवामान खात्याकडून सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने मान्सूनचा हंगाम संपल्याची घोषणा केली असली तरी देशाच्या काही भागांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे. मान्सून इतका लांबल्याची ही पहिलीच वेळ आहे. हवामान खात्याच्या ३६ विभागांपैकी पश्चिम मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 


काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात  सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक म्हणजेच ११३ टक्के अधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्य़ात झाली आहे.


मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, धुळे सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के अधिक पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली.


सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला होता. तसेच परतीच्या पावसात पुण्यातही हाहाकार उडाला होता.


दरम्यान, सध्या बिहारमध्ये पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे तीन जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाटणा शहरातील अनेक भागांमध्ये चार ते सहा फुटांपर्यंत पाणी साचले आहे. आतापर्यंत एकूण चार हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सामान्य जनताच नव्हे तर मंत्र्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या घरालाही पाण्याचा वेढा पडला होता. अखेर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांची सुटका केली होती.