भारतात सात दिवस उशिरानं दाखल होणार पाऊस
चंद्रपुरात मात्र आजही आकाश काळ्या मेघांनी भरून असल्याने इथे पाऊस आणखी बरसेल असा अंदाज आहे
पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात येणारा मान्सून आता श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यालगतच्या परिसरात दाखल झालाय. मान्सूनची ही वाटचाल जवळपास सात दिवस म्हणजे आठवडाभर मागे आहे. सामान्य स्थितीत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर २५ ते २८ मे दरम्यान मान्सूनचा पाऊस धडकण्याची अपेक्षा असते. यंदा मात्र प्रत्यक्षात साधारण सात दिवस उशिरा म्हणजे ३ जूनला दक्षिण श्रीलंकेत मौसमी पावसानं बरसायला सुरूवात केलीय. अर्थातच भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरही पाऊस किमान सात दिवस उशिरानेच येणार हे आता निश्चित झालंय. हवामान पोषक राहिल्यास पुढील आठवड्यात किंवा त्यानंतरच मौसमी पाऊस केरळ किनाऱ्यावर पडायला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. पुणे वेधशाळेनं दिलेल्या भारतीय उपखंडातील मौसमी पावसाच्या वाटचालीच्या मानचित्रातून तरी सध्या असंच चित्रं दिसतंय.
चंद्रपुरात आजही ढगाळ वातावरण
तर दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत होरपळणारे चंद्रपूरकर सोमवरी पावसात न्हाऊन निघाले. दुपारभर शहरवासीयांनी उन्हाचा तडाखा अनुभवला. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि अचानक वातावरण बदलले. काळ्या ढगांची आकाशात दाटी झाली आणि चार महिने प्रतीक्षा असलेल्या टपोऱ्या थेंबानी फेर धरला. वातावरणात सुखद बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. साधारण अर्धा तास वरुणराजाने हलक्या सरींची बरसात केली. मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने उत्तम सरी बरसण्याची आशा पल्लवित झाली आहे. या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले आहे. आकाश अजूनही काळ्या मेघांनी भरून असल्याने पाऊस आणखी बरसेल असा अंदाज आहे.
राज्यात दुष्काळाच्या झळा
राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. राज्यभरात आता केवळ ७.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ३२ धरणातला पाणीसाठा मृत झाला आहे. राज्यातल्या ४२ टक्के भूभाग दुष्काळग्रस्त आहे. गेल्या ५ वर्षात अशी तिसऱ्यांदा स्थिती ओढवली आहे. गेल्यावर्षी राज्यात केवळ ७६ टक्के पर्जन्यमान झालंय.